सोलापूर (जहाँगीर शेख ) : बदलत्या हवामानामुळे राज्यभरातील डाळिंब उत्पादक कमालीचे हैराण झाले आहेत. अशा बेभरवशाच्या हवामानातदेखील कासेगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील जहॉंगीर आणि झाकीर या शेख बंधूंनी आदर्श व्यवस्थापनातून सुमारे 14 एकरांवर तेलकट डाग रोगमुक्त डाळिंब बाग फुलवली आहे. दर्जेदार डाळिंबाला अलीकडील चार वर्षांत 90 रुपये प्रतिकिलो दर मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
भारत नागणे
सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव (ता. पंढरपूर) हे द्राक्ष उत्पादनाबरोबरच डाळिंब उत्पादनासाठी केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. यल्लमादेवीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या कासेगावातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून अत्याधुनिक साधनांचा वापर करत प्रगतिशील शेतकरी झाले आहेत. येथील अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या शेख बंधूंनी उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे गेल्या चार वर्षांपासून डाळिंब पिकात आपली ओळख तयार केली आहे.
संकटावर मात करून डाळिंबाचे उत्पादन
अलीकडील वर्षांत हवामानबदलाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. गारपीट असो, अवकाळी पाऊस, त्यामुळे द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांवर किडी-रोग वा विविध समस्या वाढल्या आहेत. मात्र, अशा संकटांना भेदून त्यावर मात करीत कासेगाव येथील जहॉंगीर व त्यांचे बंधू झाकीर शेख डाळिंब व जोडीला बेदाण्यासाठी द्राक्षाची शेती हिमतीने करीत आहेत. त्यांची सुमारे 27 एकर शेती आहे. मात्र, पाण्याच्या मर्यादा आहेत. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करत त्यांनी 14 एकरांवर भगवा जातीचे डाळिंब लावले. याच मुरमाड व हलक्या जमिनीवर पूर्वी ज्वारी, बाजरी यांसारखी पावसाच्या पाण्यावर येणारी पिके ते घेत असत.
डाळिंब शेतीतील व्यवस्थापन
1) शेख आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेतात कष्ट करतात. त्यामुळे मजुरीच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे.
2) आज सुमारे 18 ते 19 एकर क्षेत्र त्यांनी ठिबक सिंचनाखाली आणले आहे.
3) अन्य हंगामात पाण्याची टंचाई असल्याने दरवर्षी मृग बहार धरला जातो.
4) दरवर्षी प्रतिझाडास 20 किलो शेणखत दिले जाते. त्यासाठी संपूर्ण बागेसाठी चार लाख रुपयांचा खर्च करून शेणखत विकत आणले जाते. निंबोळी पेंडीचाही वापर होतो. या खतांच्या वापरामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली आहे.
5) झाडांची वाढ चांगली व्हावी, फळांचा आकार मोठा होण्यासाठी, त्यास चमक यावी, यासाठी विद्राव्य खतांचा वापर होतो. काही संजीवके वा टॉनिकी वापरली जातात.
6) वातावरणाचा अंदाज घेऊनच कीडनाशकांची शक्यतो प्रतिबंधक फवारणीच केली जाते. विनाकारण फवारणी टाळली जाते.
7) माती परीक्षण सातत्याने केले जाते. त्या आधारे मुख्य खतांसह दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही आवर्जून केला जातो.
8) बहार घेण्याआधी मेमध्ये व बहार धरण्याच्या वेळी जुलैच्या दरम्यान अशा दोन वेळा छाटणी होते. सेटिंग चांगले होणे व फळ मजबूत करणे या गोष्टींवर भर असतो.
9)एक विहीर व एक बोअर आहे. दिवसाआड पाणी नियोजन केले जाते. लिंबू आकाराची डाळिंबे झाल्यानंतर दररोज प्रतिझाड 20 लिटर, पेरूच्या आकाराची फळे झाल्यानंतर 25 ते 30 लिटरपर्यंत, तर फळांची पूर्ण वाढ झाल्यानंतर 50 लिटरप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन होते.
10) प्रतिफळाचे वजन- 200 ते 500 ग्रॅम, प्रतिझाड 100 फळे ठेवण्याचे नियोजन
तेलकट डाग रोगमुक्त फळनिर्मिती
शेख सांगतात की, आमच्या भागात तेलकट डाग रोगाची समस्या दिसत असताना आमच्या बागेत मात्र या रोगाचा प्रादुर्भाव नाही. रोग आल्यानंतर तो नियंत्रित करणे अवघड असते. त्यापेक्षा आम्ही तो येऊ नये म्हणूनच बोर्डो मिश्रण, स्प्रेप्टोमायसीन आदींचा वापर करतो.
तेलकट डागमुक्त डाळिंब फळांना महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतातील राज्यातून मोठी मागणी होत आहे. साहजिकच शेख यांच्या डाळिंबाना इतरांच्या तुलनेत पाच ते दहा रुपयांचा दरदेखील अधिक मिळतो हे त्यांच्या चार वर्षांच्या आकडेवारीतून दिसून येते. नुकतीच त्यांनी केरळ राज्यातील व्यापाऱ्याला 65 रुपये प्रतिकिलो दराने 20 टन डाळिंबाची विक्री केली.
अलीकडील वर्षांत डाळिंबाचे मिळाले उत्पादन आणि दर
सन क्षेत्र उत्पादन (टन) दर (प्रतिकिलो)
2011- सात एकरांत 30 टन - 90 ते 100 रुपये
2012- 14 एकर 60 टन- 90 ते 100 रु. कमाल दर 105 रु.
2013- 14 एकर- 80 टन 100 रु. कमाल 107 रु.
2014- 14 एकर 110 टन- 80 रु.
कोलकाता, केरळ आदी बाहेरील राज्यांतील व्यापारी जागेवरूनच डाळिंबांची खरेदी करतात.
योग्य अंतरामुळे फळांची वाढ
शेख यांनी आपल्या 14 एकर बागेत झाडांच्या दोन ओळींमधील अंतर 15 फूट, तर दोन झाडांमधील अंतर नऊ फूट ठेवले आहे. एकरी सुमारे 310 झाडे आहेत. लागवडीचे योग्य अंतर ठेवल्यामुळे झाडांच्या चांगल्या वाढीबरोबरच फळांचीदेखील योग्य वाढ होण्यात फायदा झाला आहे. बाग नेहमी तणमुक्त ठेवल्यामुळे किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळवले आहे.
15 एकर जमिनीची खरेदी
शेख बंधूंनी चार वर्षांत 14 एकरांतील डाळिंब शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. मिळालेल्या उत्पन्नाची शेतीतच गुंतवणूक केली आहे. कीडनाशक फवारणीसाठी आधुनिक स्प्रे पंपाची खरेदी केली. आपल्या गरजेनुसार त्यात काही सुधारणाही केल्या आहेत. त्यामुळे झाडांवर कीडनाशकाचे कव्हरेज समप्रमाणात मिळते, असे शेख म्हणतात. त्यांनी 15 एकर नवीन शेतीही खरेदी केली आहे.
शरद पवार यांच्याकडून प्रशंसा
शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय डाळिंब अधिवेशनात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेख यांनी आपल्या दर्जेदार डाळिंब बागेचे छायाचित्र दिले. त्यावर त्यांनी नाव लिहिलेले नव्हते. काही वेळानंतर पवार यांनी छायाचित्रातील फळाची गुणवत्ता पाहून हे शेतकरी कोण, अशी पृच्छा करून त्यावर नाव व संपर्क क्रमांक त्यावर लिहिण्यास सांगितले व त्यांची प्रशंसा केली.
संपर्क- जहॉंगीर शेख- 9822270381
0 टिप्पण्या