पुणे (दिलीप दगडे) : मुळशीच्या भाचपट्ट्यात उसाची केली सुधारित शेती पाचट न जाळता जागेवरच कुजवणे, गांडूळ खताचा वापर, ठिबक सिंचन, रुंद सरी पद्धत आदींचा वापर करीत शेरे-अकोले (ता. मुळशी, जि. पुणे) येथील दिलीप उत्तमराव दगडे यांनी सुधारित ऊसशेतीची वाट धरली आहे. एकरी उत्पादनवाढ घेताना उसात बटाट्याचे आंतरपीक, चारसूत्री पद्धतीने बासमती तांदळाचे दर्जेदार उत्पादन, देशी गोवंशाचे संवर्धन आदी बाबींमधून त्यांनी आपली प्रयोगशील वृत्तीही जपली आहे.
अमोल कुटे
पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या तीरावर असलेल्या शेरे आणि अकोले या दोन गावांच्या सीमावर्ती भागात दिलीप दगडे यांची संयुक्त पद्धतीची सुमारे 60 एकर शेती आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने नांदणाऱ्या या घरामध्ये दिलीप यांच्यासह चार बंधू व त्यांचे चुलतबंधूही राहतात.
दिलीप हे टायर व्यवसायातील डिस्ट्रिब्युटर आहेत. त्याचबरोबर पोकलेन व्यवसायही करतात.
मात्र आठवड्यातील किमान पाच दिवस ते शेतालाच सर्वाधिक वेळ देतात.
पावसाच्या प्रदेशात ऊसशेती
मुळशी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. या भागात भातशेती केली जाते. शेतांमधून गवताचेही साम्राज्य दिसून येते. अशा स्थितीमध्ये दिलीप यांनी ऊस उत्पादन घेण्याचे ठरविले. हा प्रयोग म्हणजे सुरवातीला आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या थट्टेचा विषय झाला. मात्र दगडे यांनी काटेकोर पीकनियोजनातून उसाची चांगली शेती करताना उत्पादनवाढीकडेही वाटचाल केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची वाहवा मिळविली आहे.
ऊस उत्पादनात झाली वाढ
मुळशी परिसरात पावसाच्या अधिक प्रमाणामुळे या काळात भागातील शेतांमधून सतत पाणी वाहत असते. मे महिन्यात "वळीव' (पूर्वमोसमी) पाऊस सुरू झाल्यानंतर सप्टेंबर संपला तरी शेतात जाता येत नाही अशी परिस्थिती काही वेळा असते. त्यामुळे मुळे कुजल्याने उसाचे नुकसान होते. उसाचा गाळप हंगाम सुरू असताना मार्च महिन्यात जर ऊस तुटून गेला तर उसातील मशागतीची कामे करण्यास फक्त दोन महिन्यांचा वेळ मिळतो. या सर्व परिस्थितीमुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होतो. परिसरातील संत तुकाराम कारखान्याच्या आकडेवारीनुसार मुळशी तालुक्यातील उसाचे एकरी उत्पादन केवळ 25 टनांपर्यंत आहे. त्या पार्श्वभुमीवर दगडे यांनी आपले ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पाचट कुजवण्याचा प्रयोग
दिलीप यांच्याकडील एकरी ऊस उत्पादन 30-35 टनांच्या आसपासच होते. आता ते पाचट जागेवरच कुजवून त्याची खतनर्मिती करून त्याचा वापर करता. लागवडीच्या उसाची तोडणी झाल्यानंतर यंदा त्यांनी सुमारे साडे 14 एकरांत पाचट न जाळण्याचा प्रयोग केला आहे. यंत्राद्वारे त्याची बारीक कुट्टी केली. युरिया, सुपर फॉस्फेट आदी खते टाकून ते कुजवण्याची प्रक्रिया केली. आज हा ऊस शेतात उभा आहे. या प्रयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळणार असल्याचे दगडे म्हणाले. मागील वर्षी सुमारे अडीच एकर पाचट कुजवलेल्या क्षेत्रात त्यांनी एकरी 60 टनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे.
देशी गोवंशाच्या शेणापासून गांडूळ खत
गांडूळ खताचे महत्त्व जाणून दगडे यांनी त्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यांच्याकडे एकूण दहा बेड आहेत. यातून तीन बॅचमध्ये त्यांना सुमारे दोन टन गांडूळ खताची उपलब्धता होते. हे सर्व खत स्वतःच्या शेतामध्ये वापरले जाते. विशेष म्हणजे या गांडूळ खतासाठी फक्त देशी गोवंशाच्या शेणाचा वापर केला जातो. दगडे यांच्याकडे सुरवातीला फक्त दोन गाई होत्या. आता गोठ्यामध्ये सुमारे 17 खिलार जनावरे आहेत. यात बारा गायी आहेत. घरच्या कालवडी विकल्या जात नाहीत. गाईंचे दूध घरी आणि कामगारांना खाण्यापुरते काढून उरलेले सर्व दूध वासरांसाठी राखून ठेवले जाते. गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. गांडूळ खत आणि जीवामृताच्या वापरामुळे शेतातील रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण आले आहे.
आता सुमारे सहा एकरांवर ड्रिप घेतले आहे. यंदाच्या वर्षापासून रोपपद्धतीचा वापर सुरू केला आहे. गेल्या 22 एकर क्षेत्रांतून 975 टन म्हणजेच एकरी सरासरी 44 टनांपर्यंत उत्पादन झाले. यंदा 15 एकर क्षेत्रातून 785 टन म्हणजेच सरासरी 52 टन उत्पादन मिळाले.
चारसूत्री पद्धतीने बासमतीचे उत्पादन
दिलीप यांनी यंदा प्रथमच दोन एकरांवर बासमती तांदळाचे उत्पादन घेतले. दोन एकर क्षेत्रासाठी 25 किलो बियाणे आणले. त्याचे रोप तयार करून लागवडीसाठी चारसूत्री पद्धती व गांडूळ खताचा अधिकाधिक वापर केला. बियाणे, लागवड, खते, काढणी, मळणी यासाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च आला. दोन एकरांतून चार टन भाताचे उत्पादन निघाले. उत्तम प्रतीचा हा तांदूळ अद्याप विकला नसला, तरी बाजारात प्रतिकिलो 60 ते 70 रुपये दर त्यांना अपेक्षित आहे.
प्रयोगशीलता जपली
उसामध्ये बटाट्याचे आंतरपीक- गेल्या वर्षी चार एकरांत बटाट्याचे सलग पीक घेतले होते. एकरी 12 ते 14 टन उत्पादन झाले. किलोला 14 ते 15 रूपये दराने त्याची विक्री केली. चांगल्या उत्पादनामुळे आत्मविश्वास वाढून यंदा उसात बटाट्याचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग तीन एकरांत केला आहे. पूर्वी उसाची लागवड तीन ते साडेतीन फुटांवर केली जायची. आता ती साडेपाच फूट सरी पद्धतीने केली जाते. त्यामुळे शेतात खेळती हवा राहते. बटाटा घेणेही शक्य झाले. यंदा सुमारे पाच गुंठे क्षेत्रावर ऑक्टोबरमध्ये वांग्याची लागवड केली. बियाणे आणून घरीच रोपे तयार केली. घरी, तसेच मजूरवर्गासाठी बहुतांशी वांग्यांचा वापर केला. तर सुमारे 32 हजार रुपयांच्या वांग्यांची विक्री केली.
दिलीप यांनी पाच मजूर कुटुंबांसाठी राहण्याची व पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मजुरीची समस्या त्यांना भासत नाही. तालुका कृषी विभाग आणि संत तुकाराम साखर कारखान्यातर्फे त्यांच्या शेतावर शेतकऱ्यांसाठी पाचट खत तंत्रज्ञान कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन परमेश्वर मावकर यांच्याकडे आहे. दिलीप यांना पत्नी सौ. शालिनी यांचीही मोठी मदत होते.
आमच्या भागात उसाचे पाचट न जाळता ते कुजवण्याच्या तंत्रज्ञानाविषयी अजून फारसे प्रबोधन झालेले नाही. मी मात्र या तंत्राचा वापर सुरू केला आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यापासून रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे.
दिलीप दगडे-9822601919
0 टिप्पण्या