सांगली (सुरेश कबाड़े) :सध्या तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. मृग बाग लागवडीची केळी ही केळफूल बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. कांदे बाग लागवडीची केळी मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. दोन्हीही लागवडींच्या केळी बागा सध्या संवेदनशील अवस्थेत आहेत.
मृगबाग लागवड -
1) मृगबाग लागवड केळी निसवण्याच्या अवस्थेपासून ते घड भरण्याच्या अवस्थेत आहे, अशा वेळेस केळी फळावर फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कमळ फूल बाहेर पडल्यानंतर ऍसिटामिप्रीड दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कमळ फुलावर फवारणी करावी. द्रावणात चांगल्या दर्जाचे सर्फेक्टंट मिसळावे.
2) घडावर 8 ते 9 फण्यांची मर्यादित संख्या ठेवून कमळ फूल तोडावे. म्हणजे घडातील सर्व फण्यांची व केळी फळांची सारखी वाढ होण्यास मदत होते.
3) केळफूल तोडल्यानंतर केळी घडावर 6 टक्के सच्छिद्र असलेल्या निळ्या रंगाच्या पॉलिप्रोपिलीनच्या सच्छिद्र पिशव्यांनी आच्छादन करावे.
4) केळी बागेस 0-0-50 हे विद्राव्य खत 50 किलो प्रतिएकर याप्रमाणे 147 ते 272 दिवसांदरम्यान टप्प्याटप्प्याने द्यावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट 10 किलो हे दोन समान हप्त्यांमध्ये दोन वेळेस द्यावे.
5) केळीच्या संपूर्ण निसवलेल्या घडावर पोटॅशिअम डाय हायड्रोजन फॉस्फेट 50 ग्रॅम अधिक युरिया 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा. दुसरी फवारणी 10 दिवसांच्या अंतराने करावी. यामुळे केळी घडाचे चांगले पोषण होऊन केळी फळावर चकाकी येते. यामुळे बाजारात केळी घडास जास्त दर मिळतो.
6) बागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी केळी बागेच्या चोहोबाजूंनी वारारोधक सजीव कुंपणाची लागवड केळी लागवड करतेवेळेस करणे आवश्यक असते. ज्या शेतकऱ्यांनी अशी लागवड केली नसेल, त्यांनी ज्वारीची अथवा उंच वाढणाऱ्या मक्याच्या जातींची बागेच्या कडेने दोन ओळींत दाट लागवड करावी.
7) केळी बागेस फेब्रुवारी महिन्यात ठिबक संचाद्वारे 11 ते 12 लिटर प्रतिझाड प्रतिदिन पाणी देणे आवश्यक आहे.
कांदेबाग लागवड -
कांदेबाग लागवडीची केळी सध्या मुख्य वाढ आणि सूक्ष्म घड निर्मितीच्या अवस्थेत आहे. ही अवस्था अत्यंत संवेदनशील असून, केळी बागेस पाणी तसेच विद्राव्य खतांचे नियोजन काटेकोरपणे करावे.
1) कांदेबाग लागवडीच्या केळी बागेस उभी-आडवी पाळी देऊन खोडालगतचे तण मजुरांकरवी काढून बाग तणविरहित ठेवावी. बागेतील पिवळी तसेच वाळलेली रोगट पाने कापावीत. या पानांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी. खोडालगत आलेली पिल्ले कापून त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी.
2) विषाणूजन्य, रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास ती मुळासकट उखडून बागेबाहेर नष्ट करावीत.
2) कांदेबाग लागवडीच्या केळीस 19-19-19 हे विद्राव्य खत 75 किलो प्रति एकर, तसेच युरिया 150 किलो प्रति एकर या प्रमाणात 71 ते 146 दिवसांदरम्यान टप्प्याटप्प्याने ठिबकद्वारे द्यावे.
3) तापमानवाढीस सुरवात झाली असल्यामुळे केळी बागेच्या चोहोबाजूंस उंच वाढणाऱ्या मका किंवा ज्वारीची दोन ओळींमध्ये दाट लागवड करावी. जेणेकरून बागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण होईल.
4) ढगाळ वातावरण तसेच उष्ण हवामान व आर्द्रतेमध्ये वाढ आढळून आल्यास करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव संभवतो. अशावेळेस प्रोपीकोनॅझॉल (25 ईसी) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण बागेवर फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा. दहा दिवसांनंतर दुसरी फवारणी कार्बेन्डॅझिम (50 डब्ल्यूपी) 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. फवारणी आलटून-पालटून करावी.
5) कांदेबाग लागवडीच्या केळीस फेब्रुवारी महिन्यात 6 ते 8 लिटर पाणी प्रतिझाड, प्रतिदिन ठिबक संचाद्वारे द्यावे.
संपर्क -
प्रा. आर. व्ही. देशमुख - 9421568674
- डॉ. एस. व्ही. धुतराज - 7588612632
केळी संशोधन केंद्र, नांदेड
0 टिप्पण्या