सांगली (अरुण गवळी) : जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजेच शेतीची अधोगती हे सर्व आज मराठवाड्यातील शेतकरी अनुभवीत आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीशी एकरूप झालेली पारंपरिक पिके लयास गेली आणि त्यांची जागा अनेक संकरित, जनुकीय व विदेशी पिकांनी बळकावली आहे. यावर रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या वापराने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
1965 पासून भारतात हरितक्रांतीस सुरवात झाली. पंजाब, हरियाना यासारखी राज्ये या क्षेत्रात प्रयोगशील झाली. मात्र महाराष्ट्र बऱ्यापैकी वंचितच राहिला. 1972 च्या दुष्काळाने या भागास खूप काही शिकवले. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना अमेरिकेने पाठवलेली "मिलो'सारखी लाल ज्वारी खावी लागली, तेही तिच्याबरोबर आलेल्या कॉंग्रेस गवताच्या स्वागतासह. 1972 च्या दुष्काळातच या भागातील काही मोजक्या शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीने कापसाच्या "एच' श्रेणीमधील सीड प्लॉट घेतले. संकरित बियाणे निर्मितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग ही एक सुखद घटना या दुष्काळाने मराठवाड्यास दिली. मात्र याच घटनेमधून "युरिया' या रासायनिक खताचा प्रवेश शेतीत झाला. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक सेंद्रिय शेती व बियाण्यास सुटी देऊन संकरित बियाणे निर्मितीची वाट निवडली आणि ते लखपती झाले. या भागातील शेती आणि शेतकऱ्यांच्या सद्यःपरिस्थितीस संकरित बी-बियाणे, जनुकीय बियाणे, रासायनिक खतांचा अफाट वापर, कीडनाशके, तणनाशके यांचा अनियंत्रित वापर हे पैशाशी जोडलेले घटक जास्त जबाबदार आहेत. ग्रामीण स्वच्छतेच्या नावाखाली घरासमोरचे सेंद्रिय खतांचे उकंडे नष्ट होणे, शेतातील गोठा, बैल बारदाण्यास गळती, घरटी एक दुभती गाय या संकल्पना इतिहासजमा होऊ लागल्यामुळे शेतातील सेंद्रिय घटकांचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागला. खरीप आणि रब्बीसाठी घरचेच बी-बियाणे वापरणे ही अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा मोडीत निघाली. पिशवीबंद बियाण्यामुळे नगदी पिकांची संख्या वाढू लागली. रासायनिक खतांचा शेतीत वापर वाढला. पिकास कडू कीडनाशकांचा डोस नियमित देण्यास सुरवात केली. गेल्या चार-पाच दशकांत म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील शेती, शेतकरी आणि ग्रामीण भाग परिसर यामध्ये या सर्व गोष्टींचा फारच बोचरा बदल जाणवतो. एकत्र कुटुंब पद्धतीत बिघाड झाल्याने अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले. रासायनिक खतामुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी झाली. शेकडो पद्धतीच्या अळ्या, कीटक, भुंगे यांचा पिकांवर हल्ला सुरू झाला. त्यांच्याशी अयशस्वी लढा देण्यासाठी कीटकनाशके आली आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. या भागात शेतीचे बांध नष्ट झाले. बांधावरील बोरी- बाभळी गेल्या, बांधावरचे पक्षीही गेले. जे राहिले त्यांनाही कीडनाशकांनी अपंग केले. उभे पीक एका रात्रीत नष्ट करणाऱ्या कीटकांची संख्या वाढली. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजेच शेतीची अधोगती हे सर्व आज मराठवाड्यातील शेतकरी अनुभवीत आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीशी एकरूप झालेली पारंपरिक पिके लयास गेली आणि त्यांची जागा अनेक संकरित, जनुकिय व विदेशी पिकांनी बळकावली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील एकही पीक येथील स्थानिक हवामानास हवी तेवढी साथ देताना आढळत नाही.
बीटी कापूस, ऊस ही आपल्या परिस्थितीशी जुळणारी पिके आहेत का, याचा विचार या भागात केला जात नाही. उसासारख्या पिकास भक्कम पाणी हवे. याकरिता मराठवाड्यातील जमिनीस आज कित्येक हजार "बोअर'रूपी छिद्रे पाडली जात आहेत. 600 ते 700 फूट खोल जाण्याचे असफल विक्रम अनेक ठिकाणी नोंदले गेले. कोरड्या पडलेल्या नद्या, त्यांची अनेक ठिकाणी झालेली डबकी, आटलेल्या विहिरी, गावासभोवतीची हरवलेली वृक्षराजी, रासायनिक शेती, मानवी विष्ठेमधून निर्माण झालेली परिसर अस्वच्छता, बकाल गावे ही मराठवाड्यातील शेतीप्रधान खेड्यांची आजची अवस्था आहे. चांगले उत्पन्न येण्यासाठी 20 गाड्या, 40 गाड्या उत्कृष्ट कुजलेले शेणखत शेतात घालण्याचा सल्ला दिला जातो; पण एवढे शेणखत कुठे उपलब्ध आहे, या शेतकऱ्यांच्या प्रश्नास कुणाकडेही उत्तर नाही. आधुनिक बी-बियाणे, तंत्रज्ञान याचा येथील शेतकऱ्यांनी काळानुसार वापर केला असला तरी पूर्वीचे आनंदी हास्य आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कायम चिंतेने आक्रसलेला चेहरा, उत्पन्न जेमतेम अन् भाव नाही, बॅंकेचे, पतपेढीचे कर्ज, नापिकी, अपुरा पाऊस, पाणीटंचाई, वाढते ऊन, बियाणे, रासायनिक खते, कीडनाशकात फसवेगिरी अशा अनेक समस्यांत येथील शेतकरी पिंचून गेला आहे. मजूर समस्येमुळे नको ती शेती म्हणण्याची वेळ आली आहे. भारनियमन, विजेचे बील, थकबाकी या दुष्टचक्रांत मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे अडकलेले आहेत. साठीच्या पुढे असलेल्या शेतकऱ्यांची मुले या भागात शेतीकडे फिरकण्याचे नाव घेत नाहीत. पूर्वी शेतकरी कर्जापासून दूर होता. बॅंक आणि शेतकरी यांचा पूर्वी संबंधच नव्हता आता मात्र हे नाते आवळ्या-जावळ्यासारखे झाले आहे. पूर्वी केव्हातरी तहसील ऑफिसमध्ये जावे लागे, तेही एखाद्या शेतकऱ्यासच. आता मात्र तालुक्यातील ही कार्यालये शेतकऱ्यांनी फुलून गेलेली दिसतात. शासनाच्या विविध योजना, अनुदाने आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कागदपत्रांची भेंडोळी यास जबाबदार आहेत.
1972 पर्यंत गावात बी-बियाणे, खते, कीडनाशकांचे दुकान दिसत नव्हते. आता मात्र लहानशा गावातसुद्धा त्यांची संख्या पटीने वाढलेली आढळते, हे मराठवाड्याच्या प्रगतीचे लक्षण म्हणावे काय? काही दशकांपूर्वी येथे शेतकरी आणि आत्महत्या यांचा दुराव्यानेसुद्धा संबंध नव्हता. आज मराठवाड्यातही आत्महत्या वाढत आहेत. या भागातील लहान शेतकरी दिशाहीन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी तर कर्ज वाढ आहे. पारंपरिक सेंद्रिय शेती करावी तर उत्पन्न कमी. शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवलेल्या दिसतात. अपेक्षा हे सर्व दुःखाचे मूळ आहे याचा येथे पदोपदी अनुभव येतो.
शासनाच्या "वृक्षशेती,' "शेततळी' यासारख्या सुरेख योजनांचा या भागातील शेतकऱ्यांनी हवा तेवढा फायदा घेतल्याचे दिसून येत नाही. चार दशकांपूर्वी गाव सोडून शहरात गेलेल्या अनेकांनी परत गावी येऊन शेती करण्याचा प्रयत्न मराठवाड्यात पाहावयास मिळतो, पण त्यांचीही अवस्था फार चांगली नाही. या भागातील आठही जिल्ह्यांतील शेतकरी आजच्या क्षणी आपत्कालीन स्थितीमधून प्रवास करत आहेत. शेतीवर आधारित एखादा जोडधंदा करावा अशी मानसिकता येथे आढळत नाही. परिपूर्ण कृषी विद्यापीठ, अनेक शेती महाविद्यालये या भागांत दीपस्तंभासारखे असतानाही अनेक शेतकरी शाश्वत शेतीचा मार्ग चाचपडताना दिसत आहे. सर्व जण उद्याच्या आशेवर विसंबून आहेत. शेती हा सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा व्यवसाय करण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी स्वतःस बदलून भविष्याकडे सकारात्मक विचाराने पाहण्याची गरज आहे, असे मला वाटते.
0 टिप्पण्या