सातारा (सुरेश कबाड़े) केवळ 50 हजार रुपयांत बनवले तंत्रज्ञान सात एकर ऊस पिकात केला प्रयोग
गरज हीच शोधाची जननी म्हणतात. वाठार किरोली (जि. सातारा) येथील श्रीधर पिंगळे - 9922098810 यांनी आपल्या शेतातील गंभीर मजुरी समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधला आहे. शेताला पाणी देण्यासाठी अवघ्या 50 हजार रुपयांत स्वयंचलित ठिबक यंत्रणा घरच्या घरी तयार केली आहे. मजुरीबरोबरच त्यांनी पाणीवापरातही बचत साधली आहे.
विकास जाधव
सातारा जिल्ह्यातील वाठार (किरोली, ता. कोरेगाव) हे गाव आले, ऊस, हळद पिकांसाठी ओळखले जाते. सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात विहिरी असल्याने हा भाग बागायत आहे.
येथील श्रीधर पिंगळे आज पूर्ण वेळ शेतकरी असले तरी पूर्वी प्रसिद्ध खासगी कंपनीत व्यवस्थापकपदी नोकरीस होते. त्यांचे बंधू व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे राहतात. पिंगळे कुटुंबीयांची सुमारे 40 एकर शेती आहे. वडील गंगाधर शेती पाहायचे. त्यांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी श्रीधर यांच्यावर आली. मात्र, मुलांचे शिक्षण सुरू असल्याने नोकरी काही त्यांनी सोडली नाही.
खर्चच जास्त, उत्पादन कमी
श्रीधर यांनी नोकरी सांभाळत शेतीला सुरवात केली. ऊस, आले तसेच हंगामानुसार सोयाबीन यांसारखी पिके केली जायची. उसाचे क्षेत्र मोठे असल्याने पाणी देण्यासाठी मजूर ठेवले होते. नोकरीमुळे शेतातील सर्व कामांना मजूर लावावे लागत असल्याने भांडवली खर्च वाढत होता. त्या प्रमाणात ऊस उत्पादनात मात्र वाढ होत नव्हती. काही पिकांत तोटाही सहन करावा लागत होता. तरीही न खचता सातत्याने शेतीतील प्रयत्न सुरूच ठेवले होते. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले यांनी त्यांना शेतीतील अर्थकारण समजावून देताना पूर्ण वेळ शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे सांगितले.
होत्या केवळ समस्याच
2008 च्या सुमारास चांगली नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय श्रीधर यांनी घेतला. गावात मोठ्या प्रमाणात बागायत शेती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई असायची. मजुरी दरही जास्त आहे. मजुरांच्या हिशेबाने वा त्यांच्या वेळा सांभाळून प्रत्येक काम करावे लागे. त्याचबरोबर पाटपाणी, विजेचा लपंडाव यामुळे कष्टांत वा समस्यांत अधिक भर पडत होती. शेताला पाणी देण्यासाठी उत्पादनातील सातव्या हिश्याची मजुरांकडून मागणी होत होती. यावर उपाय काढला पाहिजे, शेतीत नवीन तंत्राचा वापर करावा असा विचार मनात येत होता. मजूर समस्येवर मात कशी करता येईल याचा विचार श्रीधर करू लागले. 40 एकर क्षेत्र प्रतिकूल परिस्थितीत एकट्याने पाहणे कठीण होत होते. याचदरम्यान अकलूज येथे सिंचन क्षेत्रातील एका कंपनीतर्फे शेताचा प्लॉट पाहण्याची त्यांना संधी मिळाली. पाणी देण्यासाठी स्वयंचलित ठिबक यंत्रणा (ऑटोमायझेशन) त्या वेळी त्यांनी पाहिली. आपल्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, त्यासाठी खर्च जास्त येत असल्याचे निदर्शनास आले. अशी यंत्रणा आपण घरच्या घरी बनवू शकतो का याचा विचार ते करू लागले.
गरज झाली शोधाची जननी
श्रीधर पूर्वी ज्या कंपनीत कार्यरत होते तेथे कॉंप्रेसर, शीतकरण आदी यांत्रिक सुविधा त्यांनी हाताळल्या होत्या. यामुळे त्या अनुभवाचा व कौशल्याचा उपयोग करून स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा तयार करण्याचे काम त्यांनी 2012 मध्ये सुरू केले.
कमी खर्चात ऑटोमायझेशन
सुमारे दीड वर्षे यावर काम केल्यानंतर श्रीधर अशी स्वयंचलित ठिबक यंत्रणा बनवण्यात यशस्वी झाले आहेत. सुरवातीला सर्व क्षेत्रात चार इंची पाइपलाइन करताना त्याच चरीतून त्यांनी छोट्या पाइपमधून व्हॉल्व्हला करंट देण्यासाठी केबल नेली. विहिरीजवळ मीटर पेटीमध्ये यंत्रणा सुरू केली. पूर्वी कंपनीत कार्यरत असताना त्यांना "डिजिटल टायमर' संबंधित माहिती होती. या "टायमर'चा वापर केला. पेटीमध्ये टायमर, ऑटोस्वीच बसवला. सध्या आपल्या सात एकर ऊस क्षेत्रासाठी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. स्वयंचलित यंत्रणा
उभारणीसाठी केबल वायरिंगसह सुमारे 50 हजार रुपये खर्च आला आहे. शेतात किती व्हॉल्व्ह ठेवले आहेत, लॅटरल ही सिंगल वा डबल आहे, पाण्याचा डिस्चार्ज किती आहे यावर पुढील खर्च अवलंबून असतो. तो धरून एकूण सुमारे 75 हजार रुपये खर्च होऊ शकतो. ही यंत्रणा पुढे किमान सात ते दहा वर्षे टिकू शकते. देखभाल खर्चही फारसा नाही, असे श्रीधर म्हणाले.
20 एकरांपर्यंत यंत्रणेची व्याप्ती
श्रीधर यांनी तयार केलेल्या यंत्रणेची क्षमता 20 एकर क्षेत्रापर्यंत आहे. टायमर वा वेळ लावून आपण कोणते क्षेत्र किती वेळ भिजवायचे हे ठरवू शकतो. समजा दोन तासांची वेळ टायमरवर सेट केली व दीड तासानंतर वीज गेली, तर ज्या वेळी ती येईल त्यानंतर उर्वरित शिल्लक अर्धा तास ही यंत्रणा पुढे काम सुरू करते. त्यासाठी पुन्हा "टायमिंग सेट' करावे लागत नाही. यंत्रणा आवश्यक नसेल तेव्हा काढून ठेवता येते.
श्रीधर यांना स्वयंचलित ठिबक यंत्रणेचे झालेले फायदे
1)क्षेत्र जास्त असल्याने पाणी देण्यासाठी मजूर लागायचे. स्वयंचलित यंत्रणेमुळे मजुरीबळात 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे.
2)या यंत्रणेमुळे विहिरीतील पाण्याचा 50 टक्के उपसा कमी होत असल्याने विजेच्या खर्चातही 50 टक्के बचत होत आहे.
3)वीजभारनियमनामुळे अनेक वेळा रात्री शेताला पाणी द्यावे लागायचे. आता त्याची गरज उरलेली नाही.
4)किमान 40 ते 50 टक्के पाणीबचत होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर वाढला आहे. साहजिकच पीक उत्पादन वाढण्यासही त्यामुळे मदत मिळणार आहे. जमिनाचा वाफसा सातत्याने टिकवता येत आहे.
5)पाणी देण्याचा ताण कमी झाल्यामुळे सर्व क्षेत्र एकट्यास नियंत्रित करता येऊ लागले आहे. श्रीधर सकाळी यंत्रणेत "टायमिंग सेट' करून पाणी नियोजन करतात. त्यामुळे अन्य ठिकाणी लक्ष देता येत आहे. त्यांचे उसाचे
एकरी उत्पादन पूर्वी 40 टन होते. त्यानंतर ते 60 ते 70 टनांवर पोचले. आता अजून चांगले शेती व्यवस्थापन करणे शक्य होऊन उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे.
1)मी तयार केलेल्या यंत्रणेद्वारे अद्याप विद्राव्य खते देण्याची सिस्टिम वा टॅंक यांचा वापर केलेला नाही. कारण माझ्या शेताची समस्या लक्षात घेऊन तीच दूर करणे हेच माझे पहिले लक्ष होते. मात्र, पुढील काळात फर्टिगेशनचे काम करणार आहे.
2)आपण नेहमीच प्रश्नच मांडतो. त्याची उकल कशी करायची हे पाहात नाही. मला मात्र प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्याबाबत कृती करणे आवडते.
3)कोणाही शेतकऱ्याला मी अशी यंत्रणा कमी खर्चात बसवून देण्यास तयार आहे. कोणताही व्यावसायिक हेतू ठेऊन त्याची निर्मिती मी केलेली नाही. केवळ माझ्या शेतातील समस्या सोडवणे हेच माझे उद्दिष्ट आहे.
4)आजकाल शेतीतील समस्या वाढल्या आहेत. मजुरी वा उत्पादन खर्चात अधिकाधिक बचत कशी करता येईल, हाच आपला खरा फायदा समजायला हवा. त्यासाठी अशा तंत्रज्ञानाची गरज आहे.
0 टिप्पण्या